भाद्रपद महिना अनेक व्रत वैकल्य आणि सण घेऊन येतो. चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची. गौरी यालाच काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन (Mahalxmi Pujan) म्हणतात हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे.भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होतं. प्रत्येक जण आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी ज्यांना अनेक ठिकाणी महालक्ष्मी पण म्हणतात, त्यांना आपल्या घरी बसवतात स्थापन करतात ), दुसऱ्या दिवशी त्यांचं मनोभावे पूजन करून त्यांना महानैवेद्य दाखवतात. तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात. गौरींचं किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं म्हणून यांना ज्येष्ठागौरी पण म्हणतात
गौरी आली, सोन्याच्या पावली… गौरी आली, चांदीच्या पावली… गौरी आली, गाई वासराच्या पावली… गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…
दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे.पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो.प्रत्येक प्रातांत नैवेद्य हा वेगवेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचं/महालक्ष्मींचं विसर्जन करतात. तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.
गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती :
1.काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जावून पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात.
2.काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.
3.काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून त्याची पूजा करतात.



