आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.मराठीमध्ये ‘आले’, हिंदीमध्ये ‘अद्रक’, संस्कृतमध्ये ‘आर्द्रक’ किंवा ’शृगबेरा’, इंग्रजीमध्ये ‘जिंजर’, तर शास्त्रीय शाषेत ‘झिंजिबर ऑफिसिनेल’ या नावाने ओळखले जाणारे आले ‘झिंजिबरेसी’ कुळातील आहे.आले सुकल्यानंतर त्याला सुंठ (शुंठी) म्हणतात.आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. आलं हे चवीला जरी तिखट असले तरी ते आपल्या आरोग्यास अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलके असते. आले हे भारतात सर्वत्र भरपूर मिळणारे औषधी कंद आहे. आले किंवा आल्याचा रस हा घरगुती औषधाच्या दृष्टीने फारच उपयोगी आहे. आहार पचवण्याची मोठी शक्ती यात आहे. पाचक, रुचिकारक, उत्तेजक, लाळ उत्पन्न करणारे हे कंद आहे. पोटात अस्वस्थ वाटत असेल तर आले हे अत्यंत परिणामकारक ठरते. तीक्ष्ण, झणझणीत शरीरदोष बाहेर काढणारे असे हे आले बहुगुणी आहे. तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते. सर्दी होऊन तीव्र डोकेदुखी जाणवत असेल तर आले, तुळस, पुदिना, गवती चहा एकत्र करून नैसर्गिक चहा बनवून प्यायल्यास डोकेदुखी नाहीशी होते. सुका खोकला, दम लागणे अशी तक्रार असल्यास आल्याचा रस मधातून घ्यावा. पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही . आल्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते. अपचन, अजीर्ण होऊन उलटी झाल्यास व मळमळल्यासारखे वाटल्यास आल्याचा रस, सैंधव, लिंबू रस, मध घालून एक एक बोट चाटवावे. ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते. सुंठ खरे पाहता आल्याचा सुकल्यानंतरचा भाग. परंतु, सुंठ पित्तशमन करते, अन्नपाचन, उदळशूळ कमी करते.


